तुमच्या ताटात काय उरलंय? निवडणुकीनंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढणार; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:09 IST2026-03-21T19:05:59+5:302026-03-21T19:09:14+5:30

रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि महागाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi Attacks Centre Over Rupee Fall and Rising Fuel Prices | तुमच्या ताटात काय उरलंय? निवडणुकीनंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढणार; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

तुमच्या ताटात काय उरलंय? निवडणुकीनंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढणार; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

Rahul Gandhi on  Middle East Tension: पश्चिम आशियातील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने विक्रमी निचांकी पातळी गाठल्याने देशात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "सरकारकडे ना दिशा आहे, ना रणनीती, आहे ती फक्त पोकळ कोरडी आश्वासने," अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

'रुपया १०० कडे; हे फक्त आकडे नाहीत, तर धोक्याची घंटा'

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक सविस्तर पोस्ट लिहून देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. "रुपया डॉलरच्या तुलनेत १०० च्या दिशेने सरकणे आणि इंडस्ट्रियल फ्युएलच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे केवळ आकडे नाहीत, तर येणाऱ्या महागाईचे स्पष्ट संकेत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले. सरकार जरी परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत असले, तरी वास्तव अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांचा पाढा वाचताना सांगितले की, इंधनाचे दर वाढल्यामुळे मालाचे उत्पादन आणि वाहतूक महाग होईल, ज्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसेल आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा वेगाने बाहेर काढतील. त्यामुळे शेअर बाजारावर प्रचंड दबाव येऊन तो कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे, सध्याच्या निवडणुकीचा काळ संपताच सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

तुमच्या ताटात काय उरलंय? सरकारला थेट सवाल

"सध्याचा प्रश्न सरकार काय म्हणतेय हा नसून, सर्वसामान्यांच्या ताटात आता काय उरलंय? हा आहे, असा खोचक सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे आणि ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केल्यामुळे आज भारताचे सामान्य नागरिक ही किंमत मोजत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतावर परिणाम

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष गेल्या २२ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धाची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे. भारताकडे येणारी तेल आणि वायूची जहाजे होर्मुझ क्षेत्रातून येताना अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे केवळ इंधनच नाही, तर फळे आणि भाजीपाला निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.

Web Title : राहुल गांधी ने चुनाव बाद पेट्रोल, गैस की कीमतों में वृद्धि की चेतावनी दी

Web Summary : राहुल गांधी ने सरकार की आर्थिक नीतियों की आलोचना करते हुए चुनाव के बाद बढ़ती महंगाई, ईंधन की कीमतों और वैश्विक तनाव और रुपये की गिरावट के कारण संभावित बाजार अस्थिरता की चेतावनी दी। उन्होंने आम आदमी की वित्तीय स्थिति पर प्रभाव पर सवाल उठाया।

Web Title : Rahul Gandhi Warns of Petrol, Gas Price Hike After Elections

Web Summary : Rahul Gandhi criticizes the government's economic policies, warning of rising inflation, fuel prices, and potential market instability post-elections due to global tensions and rupee depreciation. He questions the impact on the common man's finances.