आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:01 IST2026-04-03T11:48:26+5:302026-04-03T12:01:09+5:30
Raghav Chadha News: काल आम आदमी पक्षाने राधव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आता पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबत राघव चड्डा हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या या प्रकरणावर राधव चड्डा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…”
सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत राज्यसभेतून आवाज उठवणारे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा हे अल्पावधीतच समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरले होते. तसेच त्यांनी मांडलेल्या जनहिताच्या मुद्यांची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. एकीकडे राघव चड्डा यांची लोकप्रियता वाढत असतानाच काल आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तसेच पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबत राघव चड्डा हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या या प्रकरणावर राधव चड्डा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पक्षाने आपल्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राघव चड्डा म्हणाले की, मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा मी जनतेशी संबंधित प्रश्न उपस्थित करतो. कदाचित सर्वसाधारणपणे संसदेत उपस्थित न केले जाणारे मुद्दे मी उपस्थित करतो. पण जनतेचे प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे का? मी काही गुन्हा केला आहे का? हा प्रश्न मी यासाठी विचारत आहे कारण आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला राघव चड्डा याला संसदेत बोलणयाची संधी देऊ नका असे सांगितले आहे. आता माझ्या बोलण्यावर कुणी बंदी का घालत असेल? मी नेहमी देशातील सर्वसामान्य माणसांबाबत बोलतो. मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला. पण आम आदमी पक्षाचं नेमकं काय नुकसान झालं? असा सवाल राधव चड्डा यांनी यावेळी विचारला.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवता. तुम्ही माझा हात पकडून ठेवा. मी तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासाठीच काम करत आहे. ज्यांनी मला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सांगू इच्छितो की, माझ्या मौनाला माझा पराभव समजू नका, ‘मै वो दरिया हूँ, जो वक्त आने पर सैलाब बनता है’, अशा सूचक शब्दात चड्डा यांनी विरोधकांना इशाराही दिला आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने पक्षाच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून राघव चड्डा यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय काल घेतला होता. आम आदमी पक्षाने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहिलं होतं. तसेच राघव चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेतील उपनेते म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले होते.