राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:27 IST2025-11-19T16:26:42+5:302025-11-19T16:27:19+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील मे महिन्यातील तणावपूर्ण संघर्षावेळी चीनने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खोटी ...

राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
भारत आणि पाकिस्तानमधील मे महिन्यातील तणावपूर्ण संघर्षावेळी चीनने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खोटी माहिती मोहीम राबवली, असा गंभीर आरोप अमेरिकी संशोधन आयोगाने केला आहे. या मोहिमेत चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेल्या बनावट छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियावर भारतीय राफेल विमाने पाडले गेल्याचे दावे केले. यामुळे फ्रान्सच्या राफेलच्या विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच याचवेळी चीनने आपल्या J-35 लढाऊ विमानांचा जोरदार प्रचार सुरु केला होता.
अमेरिकी-चिनी आर्थिक आणि सुरक्षितता पुनरावलोकन आयोगाच्या (USCC) वार्षिक अहवालानुसार, भारत-पाकिस्तान संघर्षावेळी तात्काळ चीनने बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे प्रचार सुरू केला. पाकिस्तानने आपल्या हवाई दलाने पाच भारतीय विमाने पाडली असल्याचा दावा केला होता, ज्यात तीन राफेल विमाने सामील होती. चीनने या दाव्यांना खरे ठरविण्यासाठी AI-जनरेटेड फोटोंद्वारे राफेलच्या अवशेषांचे छायाचित्रे व्हायरल केली. यामध्ये चीनच्या शस्त्रास्त्रांनी ही विमाने उद्ध्वस्त केल्याचे दाखवले गेले.
भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी पाकिस्तानच्या सहा विमाने पाडल्याच्या दाव्याला पूर्णपणे खोटे ठरवले. राफेल विमान, जे फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनने तयार केला आहे, हे दुहेरी इंजिन असलेले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ते एका मिनिटात ६०,००० फूट उंची गाठते व २,२०० ते २,५०० किलोमीटर प्रति तास वेगाने जाऊ शकते. 'मिटिअर' क्षेपणास्त्रे आणि इजरायली प्रणालींनी सुसज्ज असलेले हे विमान २०१६ मध्ये भारताने फ्रान्सकडून ५९,००० कोटी रुपयांना खरेदी केले. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रेंच मंत्री जीन-इव्ह लि ड्रियन यांनी दिल्लीत ही डील फायनल केली होती.
या लढाऊ विमानाचे यश पाहून इतर देश फ्रान्सकडून ही विमाने खरेदी करतील व आपला धंदा बसेल म्हणून चीनने हे कुभांड रचले होते. यामध्ये भारताला बदनाम करत राफेलला लक्ष्य केले होते, परंतू तथ्य खूप वेगळे होते. चीनचा हा बुरखा आता अमेरिकेने जगासमोर आणला आहे.