देशभरात एलपीजी गॅससाठी रांगा कायम; ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे केंद्र सरकारचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 05:45 IST2026-03-14T05:44:48+5:302026-03-14T05:45:34+5:30
अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅसची टंचाई शुक्रवारीही कायम आहे.

देशभरात एलपीजी गॅससाठी रांगा कायम; ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे केंद्र सरकारचे आवाहन
नवी दिल्ली : अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅसची टंचाई शुक्रवारीही कायम आहे. अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांना सिलिंडरसाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. १८०० रुपये किंमत असलेला व्यावसायिक गॅस सिलिंडर काही ठिकाणी चार हजार रुपयांनाही विकला जात आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी लोक सिलिंडर घेऊन धावताना दिसल्याचे व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाले. महाराष्ट्रातही मुंबईसह अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र असून, मुंबईतील बेकरी उद्योग, कोल्हापूरचा फाउंड्री व्यवसाय आणि हॉटेल उद्योग अडचणीत सापडले आहेत.
केंद्र सरकारने एलपीजीचा तुटवडा नसल्याचा दावा करीत नागरिकांना ‘पॅनिक बुकिंग’ टाळण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले, ५ मार्चपासून देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
एलपीजी बुकिंगमध्ये अचानक किती वाढ ?
- ५५.७ लाख सामान्यत दररोज
- ७५.७ लाख युद्धामुळे दररोज
- १.५ कोटी पाइपद्वारे पुरवठा
- ३३.३७ कोटी देशात एकूण एलपीजी ग्राहक
कुठे काय घडले ?
बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आदी राज्यांत गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. मुंबई, अनंतनाग, अमृतसर, चिक्कमंगळुरू, कानपूर, भुवनेश्वर, भागलपूर, पाटणा, प्रयागराज, नवी मुंबई या प्रमुख शहरांमध्ये लोक गॅस सिलिंडरसाठी भर उन्हात रांगेत उभे आहेत.
छोटे व्यावसायिक संकटात
दिल्लीसह अनेक शहरांत फास्ट-फूड स्टॉल, छोटे हॉटेल चालक अडचणीत आले. काही ठिकाणी छोट्या सिलिंडरची किंमत सुमारे ४,००० पर्यंत गेल्याची तक्रार आहे. केरळमध्ये गॅस तुटवड्यामुळे सुमारे ४० टक्के रेस्टॉरंट बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.