Navjot Singh Sidhu: सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 14:13 IST2022-01-18T14:12:52+5:302022-01-18T14:13:26+5:30
Punjab Assembly Election 2022 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज या सर्व्हेच्या निकालाची घोषणा केली. पब्लिक व्होटिंगमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

Navjot Singh Sidhu: सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती
देशात सध्या मिनी लोकसेभेची रंगीत तालिम सुरु आहे. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत निवडणूक होत आहे. आपने लोकांची मते घेऊन कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हवा याचा सर्व्हे केला होता. हा आपचा सर्व्हे होता. यामध्ये आपच्या भगवंत मान यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचा दावा आपने केला आहे. परंतू, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. सिद्धू यांचा मुख्यमंत्री बनण्याचा इरादा काही लपलेला नाही. यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंगांनाही खूर्ची गमवावी लागली होती. त्यांच्यानंतर आलेल्या चन्नी यांनादेखील सिद्धू स्वस्थ बसू देत नाहीएत. अशा वातावरणात आता काँग्रेसही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. तेवढ्यात आपच्या सर्व्हेमध्ये सिद्धू यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाल्याने काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज या सर्व्हेच्या निकालाची घोषणा केली. पब्लिक व्होटिंगमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. यामध्ये 93.3 टक्के मते ही भगवंत मान यांना पडली आहेत. तर आपच्या सर्व्हेत सिद्धू यांना 3.6 टक्के मते पडल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आपची जादू पहायला मिळाली आहे. त्यामुळे, येथे आम आदमी पक्षाचे प्रभुत्वही दिसून येते. जाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून भाजपचेही आव्हान या दोन्ही पक्षांनी असणार आहे. तसेच, तेथील प्रादेशिक पक्षांनाही आम आदमीला तोंड द्यावे लागणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन, व यावेळी राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.