punjab rajasthan did not threaten the victims family like up rahul gandhis reply to bjp | पंजाब, राजस्थानची सरकारं उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्कार लपवत नाहीत- राहुल गांधी

पंजाब, राजस्थानची सरकारं उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्कार लपवत नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेसशासित पंजाब आणि राजस्थानमधील बलात्कारांच्या घटनांवरून निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्यांना राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नसल्याचं म्हणत राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. पंजाब, राजस्थानातल्या पीडितांना न्याय मिळत नसेल तर मी तिथेही जाईन, असं राहुल यांनी म्हटलं आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षीय दलित मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. त्यावरूव भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी राजकीय सभा घेण्याऐवजी पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटलं होतं. राहुल यांनी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जावडेकर यांच्या टीकेला राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. 'उत्तर प्रदेशाप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील सरकारं मुलीवर बलात्कार झाल्याचं अमान्य करत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात नाहीत आणि न्यायाचा मार्ग रोखतही नाहीत. तिथल्या सरकारांनी असं केल्यास मी न्यायासाठी तिथेही जाईन,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.याआधी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप नेत्यांचे दावे फेटाळून लावले. 'होशियारपूर आणि हाथरसमधील घटना अतिशय वेगळ्या आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही. हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरलं. उलट त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. पंजाब पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली,' असं सिंग म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: punjab rajasthan did not threaten the victims family like up rahul gandhis reply to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.