Punjab Election 2022: नितीन गडकरींचा दौरा अन् भठिंडामध्येही मुंबई-पुणे आणि नागपूरचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:53 IST2022-02-18T07:53:16+5:302022-02-18T07:53:52+5:30
गडकरी यांनी पंजाबमधील खन्ना, अमलोह व तलवंडी साबो या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.

Punjab Election 2022: नितीन गडकरींचा दौरा अन् भठिंडामध्येही मुंबई-पुणे आणि नागपूरचीच चर्चा
सुरेश भुसारी
भठिंडा : पंजाबमधील बहुतेक मतदारसंघात काँग्रेस व शिरोमणी अकाली दलाचा प्रभाव आहे. भाजप आपले पाय या भागात रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या भागात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. या भागातील लोकांनाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व नागपूरच्या विकासाची भुरळ पडली आहे. ‘यह नेता कुछ अलग है’ अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत होते.
गडकरी यांनी पंजाबमधील खन्ना, अमलोह व तलवंडी साबो या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. पंजाबमध्ये काँग्रेस, आप, अकाली दल-बसपा व भाजप-कैप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षात प्रामुख्याने चौरंगी लढती आहेत. महाराष्ट्रात पूल व रस्त्यांचे जाळे विणणारा नेता म्हणूनच नितीन गडकरी यांची ओळख देशाच्या या भागातही आहे.
विरोधकांवर आरोप नाही
केवळ विकासाचे मुद्दे गडकरी यांनी भाषणांमध्ये मांडल्यामुळे भटिंडामध्ये स्थानिक पत्रकारांसाठी हे नवीनच होते. या भागात प्रत्येक नेता मानव तस्करी, मादक पदार्थांची ने-आण, या विषयांभोवती लोकांना खेळवत राहतात. गडकरी यांनी राजकीय भाषण न देताना विकासाचा अजेंडा दिला. गडकरी यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, वरळीचा पूल तयार केला. नागपुरातील मेट्रो, कार्गो हबसह विकासाच्या अनेक योजना राबविल्याची माहिती या भागातील लोकांना आहे. प्रचारसभांमध्ये आलेल्या लोकांमध्ये गडकरी यांच्या भाषणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा होती.