कौटुंबिक वादातून निवृत्त अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाल्याची तर पत्नी आणि सून जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत गोळाबार करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याला पकडले. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गोळीबार करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव तरसेम सिंह असं आहे. तो सीआरपीएफमधील निवृत्त डीएसपी आहे. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, या कुटुंबामध्ये वैवाहिक आणि मालमत्तेवरून वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद एवढा विकोपाला गेला की तरसेम सिंह याने आपल्याच कुटुंबीयांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तरसेम सिंह याच्या मुलाला तीन गोळ्या लागल्या. तसेच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि सून या गोळीबारात जखमी झाले.
आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.