भगवंत मान यांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; पाच आमदारांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 23:12 IST2022-07-04T23:12:12+5:302022-07-04T23:12:37+5:30
विस्तारामुळे मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १५ झाली आहे. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते.

भगवंत मान यांचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार; पाच आमदारांनी घेतली शपथ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये आपच्या पाच आमदारांनी शपथ घेतली. मान यांच्या एका मंत्र्याने भ्रष्टाचार केल्य़ाने त्याला काढून टाकण्यात आले होते. मान सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सोमवारी सायंकाळी पंजाब राजभवनातील गुरु नानक देव सभागृहात आमदारांना मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ दिली. सुनाम मतदारसंघातील दोन वेळा निवडून आलेले आमदार अमन अरोरा यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले चार आमदार मंत्री झाले.
अरोरा यांच्यानंतर डॉ. इंद्रबीर सिंह निज्जर यांनी शपथ घेतली. ते अमृतसरच्या दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. फौजा सिंह सराय, चेतन सिंह जौरमाजरा आणि अनमोल गगन मान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनमोल या मान मंत्रिमंडळातील दुसऱ्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत.
या विस्तारामुळे मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १५ झाली आहे. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. पंजाबमध्ये १८ जण मंत्री होऊ शकतात. आपचे ११७ पैकी ९२ आमदार आहेत.