Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:40 IST2022-04-19T15:40:06+5:302022-04-19T15:40:16+5:30
Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे.

Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन
चंदीगढ: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी आता गुरुद्वारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (SGPC) आपली भूमिका मवाळ केली आहे. दोन दिवसांपूर्वी एसजीपीसीने भगवंत मान यांना माफी मागण्यास सांगितले होते. पण, आता एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी म्हणतात की, "हा एक व्यक्ती आणि त्याचे गुरू यांच्यातील विषय आहे. यापुढे आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही."
अकाली दलाची वैद्यकीय चाचणीची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 एप्रिल रोजी बैसाखीच्या दिवशी घडली होती. भगवंत मान यांनी भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वाराला भेट दिली होती. यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी भगवंत मान दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांवर अपमानास्पद आरोप करत त्यांनी वैद्यकीय तपासणीची मागणी केली होती.
भाजपची पोलिसात तक्रार
पण, सत्ताधारी आम आदमी पक्षाने भगवंत मान यांच्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले. आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग म्हणाले की, शिअद अध्यक्ष सुखबीर बादल यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेला खोटा प्रचार दुर्दैवी आहे. सुखबीर यांनी निराधार आरोप करण्यापेक्षा सकारात्मक राजकारण करावे.
यानंतर, शुक्रवारी, एसजीपीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रघुजित सिंग, कनिष्ठ उपाध्यक्ष सुरिंदर सिंग आणि सरचिटणीस कर्नेल सिंग यांनी दावा केला की ते (पंजाबचे मुख्यमंत्री) पत्रकारांशी बोलत असताना ते दारूच्या नशेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. हा गुरूचा अपमान तर आहेच पण अनैतिकतेचा कळस आहे. याबद्दल भगवंत मान यांनी माफी मागावी. भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी तर भगवंत मान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती.