Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 08:46 IST2025-05-29T08:44:56+5:302025-05-29T08:46:02+5:30
Operation Sindoor : १० वर्षांच्या श्रवण सिंगने सीमावर्ती भागात तैनात असलेल्या जवानांची सेवा करून सर्वांचं मन जिंकलं.

Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर मोठे हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईदरम्यान पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातून प्रेरणादायी घटना समोर आली आहे. १० वर्षांच्या श्रवण सिंगने सीमावर्ती भागात तैनात असलेल्या जवानांची सेवा करून सर्वांचं मन जिंकलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तारा वाली गावात गोळीबाराचा आवाज येत होता. तरीही श्रवण सिंगने जवानांना पाणी, चहा आणि लस्सी पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाने कोणालाही न विचारता स्वेच्छेने जवानांना मदत करण्यास सुरुवात केली.
७ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल रणजित सिंह मानराल यांनी श्रवणची धाडसी सेवा पाहून त्याचा विशेष सन्मान केला. अशा मुलांची देशभक्ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे असंही ते म्हणाले. श्रवणने मला मोठं झाल्यावर सैन्यात भरती व्हायचं आहे, जेणेकरून मी देशाची सेवा करू शकेन असं म्हटलं. त्याच्या वडिलांनी आम्हाला त्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.
#IndianArmy honours little boy Shravan Singh, who helped soldiers in Amritsar border by bringing water, milk, lassi, ice from his house during #operation_sindoor .#Sardar for a reason. Nation First! pic.twitter.com/1r686sFpYV
— Major Madhan Kumar 🇮🇳 (@major_madhan) May 28, 2025
७ मे रोजी भारतीय हवाई दलाने रात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. एकूण नऊ ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. यामध्ये बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह, तेहरा कलानमधील सरजल, कोटलीमधील मरकज अब्बास आणि मुझफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्प यांचा समावेश होता. ही सर्व ठिकाणं जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.
मुरीदकेमधील मरकज तोयबा, बरनालामधील मरकज अहले हदीस आणि मुझफ्फराबादमधील शवाई नाला कॅम्पवरही हल्ले करण्यात आले. कोटली येथील मकाज राहिल शाहिद आणि सियालकोटमधील मेहमोना झोया येथेही हल्ला करण्यात आला. या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानमध्ये आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला केला आणि तीन दिवस सीमावर्ती भागात सतत गोळीबार केला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ही कारवाई केली.