अमेरिकेतून परतलेल्या 'त्या' भारतीयांना शिक्षा?; आता पोलीस चौकशी की अन्य काही...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:58 IST2025-02-07T15:57:33+5:302025-02-07T15:58:10+5:30
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना सत्तेत येताच पुन्हा त्यांच्या देशात पाठवणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते.

अमेरिकेतून परतलेल्या 'त्या' भारतीयांना शिक्षा?; आता पोलीस चौकशी की अन्य काही...जाणून घ्या
नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये डंकी रूटनं आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्याची मोहिम सुरूच आहे. १०४ भारतीयांनाही अमेरिकेने त्यांच्या लष्करी विमानाने भारतात पाठवले. बुधवारी या भारतीयांना घेऊन अमेरिकन विमान अमृतसरच्या विमानतळावर उतरले. या भारतीयांसोबत झालेल्या छळावरून संसदेत गदारोळ माजला आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवणारं हे पहिले विमान आहे. आणखीही बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना भारतात पाठवले जाईल. आता परतलेल्या भारतीयांचं काय होणार, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार की अन्य कुठल्या संकटाचा सामना करावा लागणार हे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत.
१०४ भारतीयांमध्ये १२ मुले
अमेरिकेत अवैधपणे घुसलेल्या १०४ भारतीयांना अमेरिकेने परत पाठवले. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकता कायदा कठोर केला आहे. त्यामुळे जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहतायेत त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवले जात आहे. भारतात पाठवलेल्या विमानात ७९ पुरूष, २३ महिला आणि १२ मुलांचा समावेश आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना सत्तेत येताच पुन्हा त्यांच्या देशात पाठवणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते.
'त्या' १०४ भारतीयांचे काय होणार?
अमेरिकेतून भारतात परतलेल्या १०४ भारतीयांची पोलीस चौकशी करणार आहेत, हे लोक कशारितेने अमेरिकेत पोहचले. त्यांनी डंकी रूटचा वापर केला का, या भारतीयांमध्येही असेही काही लोक असू शकतात ते पर्यटन व्हिसा घेऊन अमेरिकेत पोहचले आणि व्हिसा संपताच बेकायदेशीरपणे तिथे राहू लागले. या लोकांना भारतात कुठलाही गुन्हा दाखल केला जाणार नाही कारण बेकायदेशीरपणे देशात राहण्याचा गुन्हा अमेरिकेत घडला आहे. भारतात नाही. त्याव्यतिरिक्त या सर्व भारतीयांना त्यांचे मूलभूत अधिकार पहिल्यासारखेच मिळतील.
परंतु या लोकांमध्ये कुणी भारतात गुन्हा करून अमेरिकेला गेले होते का याचीही पोलीस चौकशी करू शकतात. मानव तस्करांच्या मदतीने हे डंकी रूटने अमेरिकेत गेले होते का, या लोकांनी कुठलेही बनावट कागदपत्रे काढली आहेत का अशाप्रकारची सर्व चौकशी पोलीस करतील. जर या प्रकरणात ते दोषी आढळले तर पोलीस त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात असं दिल्लीच्या साकेत कोर्टाचे वकील शिवाजी शुक्ला यांनी म्हटलं.
किती शिक्षा होऊ शकते...?
अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांवर देशात परतल्यानंतर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही. परंतु जर कुणी फसवणूक करून, घोटाळा करून, एखादा गुन्हा करून अमेरिकेत पळून जाण्याचा मार्ग निवडला असेल तर त्यांच्यावर गुन्ह्यानुसार १ ते ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंडही आकारला जाईल. पासपोर्टमध्ये फेराफेर केलीय का हेदेखील तपासले जाईल. जर एखाद्याने आपल्या देशातील संपत्ती किंवा रक्कम बेकायदेशीरपणे परदेशात नेली असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. मानव तस्करांना हवालाच्या माध्यमातून पैसे देत डंकी रूटने प्रवास केला असेल तेही पडताळले जाईल. बेकायदेशीरपणे भारताची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांवरही इमिग्रेशन कायद्यातंर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे.
या लोकांना पुन्हा अमेरिकेत जाता येईल?
कुठल्याही देशात जाण्यासाठी व्हिसा फोर्म भरावा लागतो, ज्यात एक कॉलम असतो की तुम्हाला कधी स्थलांतरित व्हावं लागलंय का, एकदा तुमच्यावर बेकायदेशीर स्थलांतरिताचा डाग लागला तर बहुतांश देश अशा लोकांना व्हिसा देत नाहीत. अमेरिकेतून परतलेल्या या भारतीयांना पुन्हा अमेरिकेला जाणे कठीण आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसह अनेक युरोपिय देश अशा लोकांना व्हिसा देत नाहीत. अमेरिकेत अशा लोकांना १० वर्षासाठी व्हिसा बंदी असते.