पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:35 IST2025-11-13T19:33:30+5:302025-11-13T19:35:22+5:30
डॉक्टर असलेल्या शाहीन सईद हिला दहशतवादी नेटवर्कमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये वरिष्ठ डॉक्टर असलेल्या शाहीन सईद हिला दहशतवादी नेटवर्कमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासी अधिकाऱ्यांना असे आढळून आले आहे की, डॉ. शाहीन सईदचा थेट जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड उमर फारूक याची पत्नी अफिराह हिच्याशी संपर्क होता. एनडीटीव्हीच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने ही अत्यंत गोपनीय माहिती उघड झाली आहे.
जैशच्या 'महिला ब्रिगेड'ची प्रमुख अफिराह
फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा पुतण्या उमर फारूक याला नंतर एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले होते. उमर फारूकची पत्नी अफिराह बीबी ही जैशच्या नव्याने सुरू केलेल्या 'जमात-उल-मोमिनात' या महिला ब्रिगेडचा प्रमुख चेहरा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतीलस्फोटाच्या काही दिवस आधीच अफिराहला या ब्रिगेडच्या सल्लागार मंडळात सामील करण्यात आले होते. ती मसूद अजहरची धाकटी बहीण सादिया अजहर हिच्यासोबत काम करत होती. तपासी अधिकाऱ्यांच्या मते, याच अफिराह आणि सादिया अजहर या दोघींशी डॉ. शाहीन सईद नियमित संपर्कात होती.
डॉक्टरची जबाबदारी होती 'महिलांचे कट्टरतावादीकरण'
फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये वरिष्ठ डॉक्टर असलेल्या शाहीन सईद हिला तिच्या कारमध्ये शस्त्रे आणि स्फोटके सापडल्यानंतर अटक करण्यात आले होते. मूळची लखनऊची असलेली शाहीन सईद अल फलाहपूर्वी इतरही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करत होती.
तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सईद हिला जैशच्या 'जमात-उल-मोमिनात' या महिला संघटनेची भारतातील शाखा स्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासह, भारतातील महिलांना कट्टर बनवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याची मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. एका प्रतिष्ठित विद्यापीठात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेली डॉक्टर थेट पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराच्या कुटुंबाशी आणि दहशतवादी संघटनेच्या महिला ब्रिगेडशी जोडली गेल्याचे उघड झाले आहे.