पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 21:57 IST2019-02-17T21:55:50+5:302019-02-17T21:57:30+5:30
चीन आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचं विक्रम सूद यांच्याकडून विश्लेषण

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख
हैदराबाद: काश्मीरच्या पुलवामात झालेला दहशतवादी हल्ल्यामागे एक व्यक्ती नव्हे, तर एक संघटना असल्याचं रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी म्हटलं आहे. सुरक्षेतील त्रुटीदेखील या हल्ल्याला जबाबदार असल्याचंदेखील सूद म्हणाले. सूद यांनी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुरक्षेत हलगर्जीपणा असल्याशिवाय अशा प्रकारचा हल्ला होऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
हल्लेखोरांना सीआरपीएफ जवानांचा ताफा जाणार असल्याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे यामागे एक नव्हे, तर बऱ्याच व्यक्ती आहेत, असं सूद यांनी म्हटलं. भारतानं या हल्ल्याचा बदला घ्यावा, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर हा काही बॉक्सिंगचा सामना नाही. त्यामुळे एकानं ठोसा मारल्यावर दुसऱ्यानं तिच कृती करायला नको, असं उत्तर त्यांनी दिलं. 'या हल्ल्याचा बदला कधी, कुठे आणि कसा घ्यायचा ते सैन्य ठरवेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. चीननं खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या सांगण्यावरुनच चीन या कुरापती करत आहे,' असंदेखील सूद म्हणाले.
जेव्हा जेव्हा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची वेळ येते, त्यावेळी फक्त चीन पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहतो. शिनजियांग प्रांतातल्या इस्लामिक संघटना पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांशी संपर्क करतील, असं चीनला वाटत असल्यानं त्यांच्याकडून खोडा घातला जातो, असं विश्लेषण 31 वर्षे गुप्तचर विभागात काम केलेल्या सूद यांनी केलं. चीन आणि पाकिस्तान परस्परांचे हितसंबंध जपतात. चीन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या बाजूनं उभा राहतो. तर आपल्या देशातलं दहशतवादी चीनसाठी डोकेदुखी ठरू नयते, याची काळजी पाकिस्तानकडून घेतली जाते, असं सूद म्हणाले.