Protests kick in; No challenge for BJP | 'विरोधकांत लाथाळ्या; भाजपपुढे नाही आव्हान'

'विरोधकांत लाथाळ्या; भाजपपुढे नाही आव्हान'

पाटणा : झारखंड विधानसभाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांत आपापसातील लाथाळ्यांमुळे भाजपपुढे कोणतेही आव्हान नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व झारखंडचे प्रभारी नंद किशोर यादव यांनी सांगितले. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे ते आत्मविश्वासाने म्हणाले. ८१ सदस्यांच्या विधानसभेत भाजप ६५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे सांगून यादव म्हणाले की, हे पक्ष भाजपपुढे आव्हान उभे करण्याऐवजी आपापसांतच भांडत आहेत. यादव म्हणाले की, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांनी आघाडी स्थापन केली आहे, तर झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) या आघाडीत लोकसभा निवडणुकीत सहभागी होता आता मात्र तो स्वतंत्रपणे लढत आहे. याशिवाय काही पक्ष असे आहेत की, त्यांच्यामुळे भाजपचे कमी; परंतु या विरोधकांचे जास्त नुकसान होणार आहे. नंद किशोर यादव हे बिहारमध्ये मंत्री आहेत.

बिहारमध्येच केंद्रित असलेला जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष या निवडणुकीवर काही परिणाम घडवतील का, असे विचारले असता यादव म्हणाले की, या पक्षांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडणार नाही.

जनता दल (संयुक्त) आणि लोक जनशक्ती पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणि झारखंडमध्ये रघुबर दास यांच्या सरकारने जी विकासकामे केली आहेत, त्यांची लोकांनी प्रशंसा केली असून, हेच सरकार पुढेही राहावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे यादव यांनी सांगितले. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात पाच टप्प्यांत ही निवडणूक होईल. २३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.

जेडीयूचा रॉय यांना पाठिंबा
रांची : झारखंडचे माजी मंत्री सरयू रॉय यांना विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पाठिंबा देणार आहे, असे जेडीयूचे ज्येष्ठ नेते राजीव रंजन सिंह यांनी मंगळवारी येथे सांगितले. रॉय हे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत.

जेडीयू झारखंडमध्ये स्वतंत्रपणे लढत असून, रॉय यांना पाठिंबा देण्यासाठी त्याने आपला जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून उमेदवारही मागे घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे रॉय यांचा प्रचार करतील का, असे विचारले असता सिंह यांनी रॉय यांनी तशी विनंती केली, तर असे उत्तर दिले.

सिंह हे नितीश कुमार यांचे विश्वासू असून, लोकसभेत जेडीयूचे ते संसदीय नेते आहेत. नितीश कुमार यांच्याशी माझी असलेली जवळीक मला भाजपने तिकीट नाकारण्याचे एक कारण असू शकते, असे रॉय यांनी सोमवारी म्हटले होते.

मतदारांसाठी हेल्पलाईन
झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी विनयकुमार चौबे यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना असे आवाहन केले आहे की, राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी म्हणजे ३० नोव्हेंबरपूर्वी वोटर स्लिप वितरित करण्यात याव्यात.

याबाबतचा अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मतदारांसाठी १९५० ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्यांना व्होटर स्लिप मिळाली नाही आदी मुद्यांवर यातून मदत मिळेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Protests kick in; No challenge for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.