५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:11 IST2025-08-10T11:11:18+5:302025-08-10T11:11:49+5:30
एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत.

५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
उत्तरकाशीतील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे या भागात अचानक मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरात संपूर्ण गाव वाहून गेलं. इतकंच नाही तर, अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पूरबाधित लोकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, पूरस्थितीच्या पाच दिवसानंतर शुक्रवारी बाधितांना तात्काळ मदत म्हणून अवघ्या ५ हजारांचे धनादेश देण्यात आले. इतक्या कमी रकमेचे चेक पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी ही मदत स्वीकारण्यास थेट नकार दिला.
एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत. हा आमच्या दुःखाचाही अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे. "आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे, आमची घरे, पैसे, व्यवसाय सगळं वाहून गेलं आहे. त्यामुळे ही रक्कम अपमानास्पद आहे", असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की आपत्तीनंतर परिसरात वीज नव्हती, म्हणून त्यांना मेणबत्त्यांचे पाकिटे वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्या देखील चार दिवसांनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या.
यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीने म्हटले की, "आम्ही ४ रात्री अंधारात घालवल्या. अन्न गरम करण्यासाठी आम्ही लाकडे जाळली. सरकार रेशनबद्दल बोलत आहे, पण तेही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. अन्न शोधण्यासाठी आम्हाला घरोघरी भटकावे लागले."
पर्यटकांची मन मोहून टाकणारी ही गावे आता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. या स्थितीबद्दल बोलताना आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की ५,००० रुपयांचे धनादेश हे तात्पुरते उपाय होते आणि नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन अद्याप झालेले नाही.