काँग्रेसच्या अडचणी थांबेना; आधी राहुल गांधींवर कारवाई, आता मुख्यालयावर चालला बुलडोजर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:09 IST2023-03-24T20:08:58+5:302023-03-24T20:09:34+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या अडचणी थांबेना; आधी राहुल गांधींवर कारवाई, आता मुख्यालयावर चालला बुलडोजर...
Congress Office: काँग्रेसच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, तर दुसरीकडे दीनदयाल उपाध्याय मार्गावरील काँग्रेसचे बांधकाम सुरू असलेल्या मुख्यालयावर बुलडोझर कारवाई झाली आहे. पीडब्ल्यूडीच्या बुलडोझरने कार्यालयाबाहेरील अतिक्रमण हटवले आहे. नियमबाह्य जाऊन कार्यालयाच्या पायऱ्या बांधण्यात आल्याची माहिती आहे.
दीनदयाळ उपाध्याय रोडवरील काँग्रेसच्या बांधकामाधीन मुख्यालयाच्या पायऱ्या लोकांना चालण्यासाठी बनवलेल्या फुटपाथवर बांधण्यात आल्या होत्या, त्यामुळेच पीडब्ल्यूडीच्या सर्वेक्षणानंतर येथे अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी बुलडोझरने या अतिक्रमण केलेल्या पायऱ्या तोडण्यात आल्या.
राहुल गांधींवर कारवाई
आज राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काल सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना शिक्षा झाली आहे. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत म्हणजेच आज त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले.