Priyanka Gandhi on Amit Shah: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेवची माहिती देत तीन दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले. ऑपरेशन महादेवमध्ये लष्कराने पहलगाममधील गुन्हेगारांना ठार मारले आहे. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे आढळलेल्या पुराव्यांबद्दलही त्यांनी सभागृहाला माहिती दिली. त्यानंतर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी पहलगाम हल्ल्यावरुन सरकारवर कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच सोनिया गांधींच्या अश्रुंवरुनही प्रियंका गांधी यांनी अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
विरोधकांवर टीका करताना अमित शाह यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख केला होता. "एके दिवशी मी सलमान खुर्शीद यांचे विधान ऐकले की सोनिया गांधी बाटला हाऊस एन्काऊंटरवर रडल्या होत्या. त्यांनी शहीद मोहनलालसाठी रडायला हवे होते. मी उद्या संसदेत सलमान खुर्शीद यांचे विधान दाखवून देईल. १९८६ मध्ये जेव्हा दाऊद इब्राहिम कासकर पळून गेला तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, जेव्हा सय्यद सलाहुद्दीन पळून गेला तेव्हा त्यांचे सरकार होते, जेव्हा टायगर मेमन, रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ, मिर्झा शादाब बेग सारखे लोक पळून गेले तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, असं अमित शाह म्हणाले. त्यावर बोलताना प्रियंका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख केला.
सत्तेला काट्यांचा मुकुट म्हणत केवळ श्रेय घेऊन नेतृत्व साध्य होत नाही, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. "माझ्या आईच्या अश्रूंबद्दल बोललं गेलं. माझ्या आईचे अश्रू तेव्हा पडले जेव्हा माझ्या वडिलांना दहशतवाद्यांनी शहीद केलं. त्यावेळी माझी आई ४४ वर्षांची होती. आज मी या सभागृहात त्या २६ कुटुंबांच्या वेदनांबद्दल बोलू शकते कारण त्यांच्या वेदना मी जाणते. मी त्या वेदना सहन केल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद संपवण्यासाठी होते. पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आल्याने मोठा धक्का बसला. हे कोणाचे अपयश आहे? आज येथे बसलेल्या सर्व लोकांना सुरक्षा आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात मारल्या गेलेल्या २६ लोकांपैकी २५ जण भारतीय होते. तुम्ही कितीही ऑपरेशन केले तरी तुम्ही त्यांना कोणतीही सुरक्षा दिली नाही ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
शेवटी प्रियंका गांधींनी सभागृहात पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावेही वाचून दाखवली. यादरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी प्रत्येक नावामागे हिंदू असे ओरडण्यास सुरुवात केली. त्याला प्रियांका गांधी यांनी विरोधी खासदारांनी भारतीय असं प्रत्युत्तर दिलं.