Priyanaka Gandhi Jibe On Nirmala Sitharaman: वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज (11 फेब्रुवारी 2025) सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील (Union Budget Session) चर्चेत भाग घेतला. यादरम्यान देशातील महागाईवरुन भाजप नेत्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच, त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना बोचरी टीकाही केली.
प्रियंका गांधी मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हणतात, "त्या(निर्मला सीतारामन) म्हणतात की, देशात महागाई नाही, बेरोजगारी वाढलेली नाही, किमतीत वाढ झालेली नाही. कोणत्या ग्रहावर राहतात, काय माहित..' अशी बोचरी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर केसी वेणुगोपाल यांचीही टीकाकाँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनीदेखील अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर तीव्र प्रतिक्रिया दिली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, 'लोकसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला अर्थमंत्र्यांनी दिलेले उत्तर म्हणजे वस्तुस्थितीपासून कसे लक्ष विचलित करायचे याचा एक उत्कृष्ट नमुना होता. विरोधकांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी फेटाळून लावल्याने असे दिसून येते की, त्यांचा खरा हेतू अर्थसंकल्पात ठळक केलेल्या तफावतींना उत्तर देणे हा नव्हता तर फक्त राजकीय गुण मिळवणे हा होता. त्यांच्या उत्तरात, प्रमुख आर्थिक निर्देशांक - मग ते जीडीपी विकास दर असोत किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य असो...हे स्पष्ट करण्याऐवजी यूपीए काळातील आकडेवारी मांडण्यावर भर होता. महत्त्वाच्या सामाजिक कल्याणकारी योजनांवर, अर्थसंकल्पीय वाटपात होणारी घसरण किंवा कपात स्पष्ट करण्याऐवजी, त्यांनी राज्य सरकारांवर दोषारोप ढकलला,' अशी टीका त्यांनी केली.
निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हणाल्या?निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बोलताना सांगितले की, 'देशातील विकासाचा जो प्रश्न आहे, त्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भांडवली खर्चासाठी 99 टक्के कर्जे वापरुन वित्तीय जागा राखून लोकांच्या हातात रोख रक्कम वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक पावले उचलण्यात आली आहेत.'
बजेट समतोल निर्माण करणार'अर्थसंकल्प राष्ट्रीय विकासाच्या गरजा आर्थिक प्राधान्यांसह संतुलित करतो. सरकार 99 टक्के कर्जे भांडवली खर्चासाठी वापरत आहे, जी GDP च्या 4.3 टक्के आहे. अर्थसंकल्पाचा फोकस गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांवर आहे. कृषी, एमएसएमई आणि निर्यातीला चालना देण्यासाठी नवीन योजना आणि सुधारणा आणण्याचे उद्दिष्ट आहे, जे विकास आणि ग्रामीण समृद्धी आणि लवचिकतेचे इंजिन म्हणून काम करतील,' असे निर्मला सीतारामन संसदेत म्हणाल्या.