प्रियांका गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना; राहुल गांधींचीही प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 09:52 IST2022-08-10T09:51:51+5:302022-08-10T09:52:16+5:30
Priyanka Gandhi : यापूर्वी ३ जून रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

प्रियांका गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना; राहुल गांधींचीही प्रकृती बिघडली
काही दिवसांपूर्वी महागाईविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. दोन महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी देखील आजारी असल्याने त्यांचा आजचा राजस्थान दौरा रद्द करण्यात आला आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्विट करून त्या कोरोनाबाधित असल्याची माहिती दिली आहे. तसेच घरीच आयसोलेट झाल्याचे त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३ जून रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोनिया यांना तेव्हाच ईडीची नोटीस आली होती. सोनिया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
भारतात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे १६,०४७ रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 19,539 लोक बरे झाले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्या 1,28,261 वर गेली आहे.
Tested positive for covid (again!) today. Will be isolating at home and following all protocols.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 10, 2022
महागाई आणि जीएसटीविरोधात काँग्रेसने नुकतीच देशभरात निदर्शने केली होती. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला. पोलिसांनी सर्व खासदारांना विजय चौकात ताब्यात घेतले होते. तर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला होता. प्रियांका गांधी रस्त्यावरच धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.