प्रियांकाच्या कपड्यांमुळे आसाम पर्यटनाच्या कॅलेंडरवर आक्षेप, पर्यटन मंत्र्यांनी केली पीसीची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:17 IST2018-02-21T15:16:30+5:302018-02-21T15:17:46+5:30
आसाम टूरिझमच्या कॅलेंडरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो छापल्याने टीका केली जाते आहे.

प्रियांकाच्या कपड्यांमुळे आसाम पर्यटनाच्या कॅलेंडरवर आक्षेप, पर्यटन मंत्र्यांनी केली पीसीची पाठराखण
दिसपूर- आसाम टूरिझमच्या कॅलेंडरवर अभिनेत्री प्रियांका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो छापल्याने टीका केली जाते आहे. आसाम पर्यटनाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदावरुन प्रियांकाला काढून टाकावं, अशी मागणी झाल्यानंतर आसामचे पर्यटन मंत्री हिमंत बिस्वा सर्मा प्रियांकाची पाठराखण केली आहे. विरोधक या प्रकरणातून स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचं हिमंत बिस्वा सर्मा यांनी म्हंटलं.
आसाम पर्यटनाची सदिच्छादूत असलेल्या प्रियांका चोप्राची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली. पण, विरोधक या प्रकरणातून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असं सांगत आसामचे पर्यटन मंत्री हिंमत बिस्वा सर्मा यांनी प्रियांकाची पाठराखण केली.
आसाम पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) च्या कॅलेंडरवर प्रियांका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो छापल्याने काँग्रेस आमदार नंदिता दास, रुपज्योती कुर्मी यांनी टीका केली होती. आसाम पर्यटन विकास महामंडळाच्या कॅलेंडरवर प्रियांकाला आसमच्या पारंपरिक पेहरावात दाखवायला हवं होतं, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आसाम पर्यटनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तिची नियुक्ती रद्द करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली होती.
'सरकारने आसामी समाजाचा आदर करावा. फ्रॉक हा आसामचा पारंपरिक पोशाख नाही. आसामी समाजाचा मान कसा राखावा, हे सरकारला समजायला हवं. पारंपरिक मेखेला सेदोरही वापरता आला असता.' असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं.
2016 साली आसाम सरकारने अभिनेत्री प्रियांका चोप्राची आसाम पर्यटन विकास महामंडळाच्या ब्रॅण्डअॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली होती. पर्यटन विकास मंडळाची ब्रॅण्डअॅम्बेसेडर असूनही पूर परिस्थितीमध्ये प्रियंकाने प्रतिक्रिया दिली नसल्याने तिच्यावर तेव्हा टीका झाली होती.