कर्नाटकमध्ये खासगी विमान कोसळले; मोकळ्या मैदानात क्रॅश होऊनही पायलट, प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 16:08 IST2026-02-08T16:08:45+5:302026-02-08T16:08:58+5:30
Karnataka News: विजयपुरा जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यात रविवारी दुपारी एका खासगी मिनी विमानाचा अपघात झाला. सुदैवाने पायलट आणि प्रवासी सुरक्षित आहेत. सविस्तर वाचा.

कर्नाटकमध्ये खासगी विमान कोसळले; मोकळ्या मैदानात क्रॅश होऊनही पायलट, प्रवासी बचावले
विजयपुरा : कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलुरु गावात रविवारी दुपारी एका खासगी मिनी विमानाचा भीषण अपघात झाला. हे विमान गावातील एका मोकळ्या मैदानात कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने पायलटसह त्यातील दोन्ही प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेले प्राथमिक माहितीनुसार, हे मिनी विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानाने नियंत्रण गमावल्यानंतर ते मंगलुरु गावाजवळील एका मोकळ्या शेतात जोराने आदळले. विमानाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले.
जीवितहानी टळली
विमान जमिनीवर आदळल्याने त्याचा दर्शनी भाग आणि पंखांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमानातील वैमानिक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही, त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. विमानाने लोकवस्ती असलेल्या भागात न कोसळता रिकाम्या मैदानाचा आधार घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान कोणाचे होते, कुठून कुठे जात होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय कडून केला जाण्याची शक्यता आहे.