पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' राज्यातून लढवणार 2019 ची लोकसभा निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:15 IST2018-10-08T09:45:00+5:302018-10-08T13:15:22+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय भाजपासाठी मास्टरस्ट्रोक ठरला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' राज्यातून लढवणार 2019 ची लोकसभा निवडणूक?
भुवनेश्वर - गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय भाजपासाठी मास्टरस्ट्रोक ठरला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व भारतात भाजपाची पाळेमुळे भक्कम करण्यासाठी ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मोदींनी पुरी येथून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ओदिशातील भाजपाच्या समितीने दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी ओडिशातील भाजपाच्या कार्यकारिणीने दिलेला प्रस्ताव स्वीकारल्यास ते ओदिशामधून निवडणूक लढवणारे नरसिंह राव यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरतील. याआधी 1996 साली नरसिंह राव यांनी ओडिशामधील बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 62.5 टक्के मते मिळवून बाजी मारली होती.
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व भारतावर लक्ष केंद्रित आहे. मोदी यांनी पुरी येथून निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, असा दावा भाजपाचे ओडिशा अध्यक्ष वसंत पांडा यांनी केला आहे.
ओडिशामध्ये सध्या दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या बीजेडीविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ओदिशातील २१ पैकी १, पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २, तेलंगणामधील १७ पैकी १ आणि आंध्र प्रदेशमधील २५ पैकी २ जागांवर विजय मिळवला होता. आता या राज्यांमधून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.