म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर फडकवणार तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 16:36 IST2018-10-18T16:35:57+5:302018-10-18T16:36:34+5:30
भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून देशाला संबोधित करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत.

म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर फडकवणार तिरंगा
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून देशाला संबोधित करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. देशाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच होणार आहे. मात्र त्याला कारणही तसेच विशेष आहे.
२१ ऑक्टोबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकवणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी स्वत: याची घोषणा केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी ही माहिती दिली. काँग्रेसने अनेक दशकांपासून ज्या नेत्यांच्या योगदानाकडे कानाडोळा केला. त्यांच्या जोगदानाचा आमचे सरकार गौरव करेल, असे मोदींनी सांगितले.
सरदार पटेल यांच्या पुतळ्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिले. देशातील शेकडो संस्थानांचे विलीनीकरण करून देशाला एकसंध करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना काँग्रेसने नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली, असा आरोप मोदींनी केला.