PM Modi to Address Nation: पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे, परंतु भारत त्यास जशासतसे प्रत्यूत्तर देत आलाय. यानंतर आज पंतप्रधाननरेंद्र मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धविरामाबद्दल ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
पाकिस्ताननं युद्धविरामाची विनंती केल्यानंतर भारतानं ती मान्य केली होती. परंतु, त्या रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला केला होता. रविवारी रात्री मात्र कोणताही आगळीक केली नाही.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि इतर अनेक अधिकारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.
सैन्यप्रमुखांचा पाकिस्तानला इशारापत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, आपल्याला हवाई संरक्षण कारवाईला समजून घेणं आवश्यक आहे. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्यानुसारच कारवाई केली. "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानलं. पाकिस्ताननं ही लढाई स्वतःची बनवली, म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं," असं एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले.