Narendra Modi: स्वत:मध्ये वेळीच बदल करा, अन्यथा...; पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासदारांना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 06:48 IST2021-12-08T06:48:07+5:302021-12-08T06:48:43+5:30
भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यावेळी माेदींनी गैरहजर खासदारांची चांगलीच शाळा घेतली.

Narendra Modi: स्वत:मध्ये वेळीच बदल करा, अन्यथा...; पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासदारांना तंबी
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेच्या अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या आपल्याच पक्षाच्या खासदारांना चांगल्याच कानपिचक्या देतानाच तंबी दिली आहे. स्वत:मध्ये बदल केला नाही, तर भविष्यात याेग्य वेळी बदल केले जातील, असा इशाराच माेदींनी दिला आहे.
भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यावेळी माेदींनी गैरहजर खासदारांची चांगलीच शाळा घेतली. ते म्हणाले, मी तुम्हाला वारंवार संसदेत उपस्थित राहण्यास सांगताे. तुम्ही अनुपस्थित राहिल्यास कामांवर परिणाम हाेताे. लहान मुलांसारखे सतत सांगणे मला आवडत नाही. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहायला हवे. स्वत:मध्ये बदल करा, नाहीतर मला माेठा बदल करावा लागेल, असे माेदींनी खडसावून सांगितले. पंतप्रधानांनी यापूर्वीही गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर नाराजी व्यक्त केली हाेती. खासदारांनी विविध क्रीडा स्पर्धा, फिटनेस तसेच सूर्यनमस्कार इत्यादी स्पर्धांचे आयाेजन करण्यास पंतप्रधानांनी सर्व खासदारांना सांगितले आहे. तसेच आपापल्या मतदारसंघातील पद्म पुरस्कार विजेत्यांशी संपर्क ठेवून संवाद ठेवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली.
‘चाय पे चर्चा’ आयाेजित करण्याच्या सूचना
सर्व खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात स्थानिक नेत्यांसाेबत संवाद साधावा तसेच पक्ष बळकटीकरणासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांचे आयाेजन करण्याच्या सूचना पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान माेदी यांच्या वाराणसी मतदारसंघात १४ डिसेंबरला सर्व भाजप नेत्यांना या कार्यक्रमासाठी बाेलाविण्यात येणार आहे.