३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 06:36 IST2025-08-16T06:29:11+5:302025-08-16T06:36:57+5:30
१ लाख कोटींची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना राबविणार, जीएसटीचा आढावा घेऊन सामान्य लोकांसाठी कर कमी करणार

३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 'पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना' व दिवाळीपर्यंत सामान्यांवरील करांचा बोजा कमी करण्यासाठी जीएसटीत सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. १५ ऑगस्ट रोजी मी माझ्या देशातील तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू करत आहे. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल.
मोदींनी म्हटले की, यावर्षी दिवाळीत आपल्याला एक मोठी भेट मिळणार आहे. जीएसटी अस्तित्वात येऊन ८ वर्षे झाली आहेत. आम्ही त्यात सुधारणा करून करप्रणाली सोपी केली आहे. आता सामान्य लोकांसाठी कर कमी करू, दैनंदिन वस्तू स्वस्त होतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रथमच उल्लेख
पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना जन्माला आली होती. १०० वर्षांची राष्ट्रसेवा ही अभिमानाची गोष्ट आहे. वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाने संघाने १०० वर्षे आपले जीवन भारतमातेच्या कल्याणासाठी समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, ज्याची ओळख सेवा, समर्पण, संघटना आणि अतुलनीय शिस्त ही आहे.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी मोहन भागवतांना खूश करण्यासाठी त्यांच्या भाषणात आरएसएसचा उल्लेख केला, कारण आता मोदी त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत.