"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:30 IST2025-09-17T16:28:56+5:302025-09-17T16:30:15+5:30
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवही, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू असताना आला आहे, हा केवळ योगायोग नाही. तर..."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी २०४७ पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अंबानी म्हणाले, "आज भारतीयांसाठी उत्सवाचा दिवस आहे. आज आपले आदरणीय आणि प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. देशातील व्यापारी समुदाय, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आणि अंबानी कुटुंबाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझी इच्छा आहे की, ते २०४७ पर्यंत देशाचे पंतप्रधान रहावेत. तेव्हा भारतीय स्वातंत्र्याचे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
अंबानी पुढे म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम गुजरातला औद्योगिक राजधानी बनवले आणि आता ते संपूर्ण देशाचा कायापालट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवही, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू असताना आला आहे, हा केवळ योगायोग नाही. 'जीवेत शरद: शतम् '. देवाने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक अवतारी पुरुष म्हणून पाठवले आहे. मी असा नेता कधीही पाहिला नाही, जो न थांबता, न थकता अविरतपणे काम करतो. मी देशभरातील लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजपच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राजकारण्यांशिवाय, शाहरुख खान, आमिर खान आणि कंगना राणावत आदी सेलिब्रिटींनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.