राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:00 IST2025-01-13T13:59:15+5:302025-01-13T14:00:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील ६.५ किमी लांबीच्या झेड-मोर्ड बोगद्याचे उद्घाटन केले.

Prime Minister Narendra Modi inaugurated the Z Morh tunnel in Jammu and Kashmir | राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

Z-Morh Tunnel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात महत्त्वाच्या अशा झेड-मोर्ह बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा वाढवली आहे. राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये या बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

बोगद्याच्या उद्घाटनानंतर श्रीनगर-सोनमर्ग मार्गावरील रस्त्याचा भाग सर्व ऋतूंसाठी खुला राहील आणि सोनमर्ग प्रदेशातील हिवाळी पर्यटनालाही चालना मिळेल. श्रीनगर-लेह महामार्ग नॅशनल हायवे एकवर बांधलेला ६.४ किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग ६ महिने बंद असतो. बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व प्रकारच्या वातावरणात इथून प्रवास करता येणार आहे.

१ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार

पूर्वी श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर ते सोनमर्ग दरम्यान १ तासापेक्षा जास्त वेळ लागत असे. या बोगद्यामुळे आता हे अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे. याशिवाय वाहनांचा वेगही ३० किमी/तास वरून ७० किमी/तास होईल. पूर्वी हा दुर्गम डोंगराळ भाग पार करण्यासाठी ३ ते ४ तास लागत होते. आता हे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत कापले जाणार आहे. पर्यटनाबरोबरच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या बोगद्यामुळे लष्कराला लडाखपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. बर्फवृष्टीदरम्यान लष्कराला हवाई दलाच्या विमानांमध्ये जे सामान वाहून घ्यावे लागत होते, ते आता कमी खर्चात रस्त्याने पोहचवता येणार आहे.

झेड-मोर्ह बोगदा २७०० कोटी रुपये खर्चून बांधला आहे. २०१८ मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. हा बोगदा ४३४ किमी लांबीच्या श्रीनगर-कारगिल-लेह महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत ३१ बोगदे बांधले जात आहेत, त्यापैकी २० जम्मू-काश्मीरमध्ये आणि ११ लडाखमध्ये आहेत.

२०१२ मध्ये सुरू झाला बोगदा प्रकल्प

बोगदा प्रकल्प २०१२ मध्ये सुरू झाला होता. हा बोगदा प्रकल्प बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आला होता, मात्र नंतर हे काम खासगी कंपनीकडे देण्यात आले. हा बोगदा ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू होणार होता, पण कोरोनाच्या काळात बांधकामाला वेळ लागला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करण्यात आली होती आणि त्याचे उद्घाटन आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले होते. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ५६५२ फूट उंचीवर बांधण्यात आला आहे.

एनएटीम तंत्रज्ञानाचा वापर

हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेत बोगदा खोदण्याबरोबरच त्याचा ढिगाराही काढला जातो. ढिगारा काढून आतून मार्ग तयार केला जातो, त्याच पद्धतीने बोगद्याची भिंतही तयार केली आहे. त्यामुळे डोंगर कोसळण्याचा धोका टळतो. या तंत्रात बोगद्याचे काम सुरू होण्यापूर्वी पर्वत, त्याच्या सभोवतालचे हवामान आणि मातीची तपासणी केली जाते.

झोजिला बोगद्याचे काम २०२८ मध्ये पूर्ण होणार

बोगद्याच्या प्रक्रियेत एकाच वेळी किती यंत्रसामग्री आणि किती लोक काम करू शकतील याचा अंदाज घेतला जातो जेणेकरून डोंगराच्या पायथ्याला हानी पोहोचू नये. झेड-मोर्ह बोगद्याशेजारी बांधण्यात येत असलेल्या झोजिला बोगद्याचे काम २०२८ मध्ये पूर्ण होणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच बालटाल, कारगिल आणि लडाखला पोहोचता येणार आहे.
 

Web Title: Prime Minister Narendra Modi inaugurated the Z Morh tunnel in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.