पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 04:53 IST2025-05-08T04:53:18+5:302025-05-08T04:53:52+5:30
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध पुरुषांचा बळी गेला. मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे समर्पक नाव देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ?
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या निर्णायक हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध पुरुषांचा बळी गेला. मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे समर्पक नाव देण्यात आले.
‘सिंदूर’ नावाचे दडले आहेत कोणते पाच अर्थ?
पवित्र वचन : भारतीय स्त्रीसाठी सिंदूर ही केवळ शोभा नसून, पतीच्या आयुष्याचे आणि नात्याच्या रक्षणाचे वचन असते.
भावनिक हेतू : पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या स्त्रियांना या ऑपरेशनद्वारे संरक्षण, न्याय आणि सन्मान मिळावा, हा भावनिक हेतू.
भारतमातेचा अभिमान : हे नाव भारतमातेच्या मस्तकावरील रक्ताच्या थेंबासारखे शौर्य दर्शवते, जेव्हा तिच्या संततीवर हात उठेल, तेव्हा ती देवीच्या रूपात प्रत्युत्तर देते.
बलिदानाचा रंग : सिंदूरचा रंग लाल असतो, जो शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक मानला जातो. भारतीय जवानांचे धाडस हा रंग दर्शवितो.
स्पष्ट इशारा : सिंदूर हा सीमेवर लावलेला स्पष्ट लाल संकेत आहे, ‘जिथून पुढे गेलात, तिथे भारताची अस्मिता रक्तरंजित होऊनच उत्तर देईल.’
पाकिस्तानी शोधताहेत... हे ‘सिंदूर’ म्हणजे नेमके
आहे तरी काय?
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लोक गुगलवर एअर स्ट्राइक, इंडियन आर्मी, इंडिया आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्च करत आहेत. पाकिस्तानमधील गुगल ट्रेंडनुसार ते आता सिंदूर म्हणजे काय, याची माहिती घेत आहेत. ऑपरेशन सिंदूरव्यतिरिक्त, पाकिस्तानी लोक भारताबद्दल सतत शोध घेत आहेत.
यात इंडिया अटॅक बहावलपूर, इंडिया अटॅक ऑन पाकिस्तान टुडे, इंडिया अटॅक ऑन पाकिस्तान, इंडिया स्ट्राइक्स पाकिस्तान असे कीवर्ड सर्च केले जात आहेत. याशिवाय, पाकिस्तानचे लोक पाकिस्तानी सैन्याबद्दल माहिती शोधत आहेत. सोबतच सर्वात शक्तिशाली सैन्य, भारतीय सैन्य, पाकिस्तान सैन्य
इत्यादी विषयांवरही माहिती घेतली जात आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिली माहिती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. या दहशतवादी तळांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा गड असलेल्या बहावलपूर आणि लष्कर-ए-तय्यबाचा अड्डा मुरीदके यांचा समावेश आहे.