पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक प्रश्न विचारत, गांधी कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. महत्वाचे म्हणजे, यावेळी त्यांनी केवळ गांधी कुटुंबातील तीन नेत्यांनाच लक्ष्य केले नाही, तर संपूर्ण विरोधी पक्षालाही आपल्या निशाण्यावर घेतले.
एकाच वेळी एससी/एसटी प्रवर्गातील एकाच कुटुंबातील 3 खासदार झाले आहेत का? -मोदी म्हणाले, "मी या सभागृहाच्या माध्यमाने देशवासीयांसमोर एक महत्वाच प्रश्न ठेऊ इच्छितो. देशवासीय माझ्या या प्रश्नावर चिंतनही करतील आणि चर्चाही करतील. मला कुणी सांगा, एकाच कालखंडात संसदेत एससी वर्गाचे एकाच कुटुंबातील तीन खासदार कधी झाले आहेत का? मी दुसरा प्रश्न विचारतो, मला कुणा सांगा की, एकाच कालखंडात, एकाच वेळी, संसदेत एसटी प्रवर्गातील एकाच कुटुंबातील ३ खासदार झाले आहेत का? काही लोकांच्या वाणीमध्ये आणि व्यवहारात किती फरक असतो, हे माझ्या एकाच प्रश्नावरून लक्षात येते. जमीन आणि आकाशाचे अंतर आहे, रात्र आणि दिवसाचे अंतर आहे."
महत्वाचे म्हणजे, काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी गेल्या काही दिवसांपासून जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. ते अनुसूचित जातीच्या नेतृत्वाबद्दल बोलत आहेत. मागास समाजाच्या नावावर राजकारण करत आहेत. अशा परिस्थितीत, या पद्दतीचा निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्वच विरोधकांना लक्ष केले आहे.
'त्यांना' संसदेत गरीबांसंदर्भात बोलणे बोरिंगच वाटणार -मोदी म्हणाले, "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशभरात ७०-७५ टक्के, जवळपास १६ कोटींहूनही अधिक घरांजवळ पाण्याचे कनेक्शन नव्हते. आमच्या सरकारने पाच वर्षांत १२ कोटी कुटूंबांच्या घरात नळाने पाणी देण्याचे काम केले आहे आणि हे काम वेगाने पुढे जात आहे. आम्ही गरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. यामुळेच राष्ट्रपतींनीही आपल्या अभीभाषणात याचे सविस्तर वर्णन केले आहे. जे लोक, गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून आपले मनोरंजन करत असतात, त्यांना संसदेत गरीबांसंदर्भात बोलणे बोरिंगच वाटणार. मी त्यांचा राग समजू शकतो." असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.