मराठी साहित्य संमेलनात 'छावा'ची धूम, PM मोदींनी उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:18 IST2025-02-21T20:17:13+5:302025-02-21T20:18:21+5:30
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Delhi 2025 : आजपासून दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मराठी साहित्य संमेलनात 'छावा'ची धूम, PM मोदींनी उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट; म्हणाले...
सध्या देशभर 'छावा' चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. या चित्रपटाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. पंतप्रधनानांनी या चित्रपटाचा उल्लेख थेट राजधानी दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केला. पंतप्रधानांनी 'छावा' चित्रपटाचा उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात जोरदार शिट्ट्या, घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आजपासून दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
"सध्या तर, 'छावा'ची धूम सुरू आहे..." -
मोदी म्हणाले, "आपली मुंबई महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. बंधूंनो जर मुंबईचा उल्केख आलाच आहे, तर चित्रपटांशिवाय ना साहित्याची चर्चा होऊ शकते ना मुंबईची. हा महाराष्ट्र आणि ही मुंबईच आहे, ज्यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांनाही एका उंचीवर नेले आहे आणि सध्या तर, 'छावा'ची धूम सुरू आहे." पंतप्रधान मोदींच्या तोंडून 'छावा' चित्रपटाचा उल्लेख होताच, सभागृहात जोरदार शिट्ट्या, टाळ्यांचा कडकटात आणि घोषणा, असे दृष्य बघायला मिळाले. मोदी पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा या स्वरुपातील परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीनेच करून दिला आहे."
महाठी भाषेची थोरवी सांगताना मोदी म्हणाले, मराठी सहित्यात विज्ञान कथांचीही रचना झाली. भूतकाळातही आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रातही महाराष्ट्रातील लोकांचे मोठे योगदान दिले आहे. याच संस्कृतीमुळे महाराष्ट्राने नेहमीच नवे विचार आणि प्रतिभेला आमंत्रित केले आणि प्रगती साधली आहे.
भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर संस्कृतीची वाहक -
समर्थ रामदास स्वांमींचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते मात्र, भाषा समाजाच्या निर्मितीत तेवढीच महत्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या मराठीने महाराष्ट्र आणि राष्ट्रातील अनेकांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन आपली सांस्कृतीक जडणघडण केली आहे. यामुळे, समर्थ रामदास म्हणत होते,
'मराठा तितुका मेळवावा।
महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे।
पुढे आनिक मिळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे।।"
मराठी एक संपूर्ण भाषा -
"मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरताही आहे आणि वीरताही आहे. मराठीमध्ये सौंदर्यही आहे आणि संवेदनाही आहे. समानताही आहे आणि समरसताही आहे. यात आध्यात्माचे स्वरही आहे आणि आधुकताही आहे. मराठीत भक्तीही आहे, शक्तीही आहे आणि युक्तीही आहे." अशा शब्दात मोदींनी मराठी भाषेची महती सांगितली.