president ramnath kovind address to the nation befor independence day india china standoff corona virus | अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार, राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला इशारा

अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार, राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला इशारा

नवी दिल्ली - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील जनतेला संबोधित केले. राष्ट्रपती म्हणाले, या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात नेहमी प्रमाणे धूम-धाम राहणार नाही. याचे कारण स्पष्ट आहे, आज संपूर्ण जग एका अशा व्हायरसचा सामना करत आहे, ज्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. एवढेच नाही, तर जवळपास सर्वच प्रकारच्या कार्यात अडथळा निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी चीनलाही कडक संदेश दिला आहे. जो अशांतता निर्माण करेल, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनी स्वातंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला चीनचे नाव न घेता सीमा वादावर भाष्य केले. आज जेव्हा संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, तेव्हा आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूर जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, असेही राष्ट्रपती कोवींद यावेळी म्हणाले.

राष्ट्रपती म्हणाले, भारत मातेचे ते पुत्र, राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जगले आणि त्यासाठीच त्यांनी आपले बलिदान दिले. संपूर्ण देश  गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन करतो. प्रत्येक भारतीय त्याच्या कुटुंबातील सदस्यांप्रती कृतज्ञ आहे. त्यांच्या शौर्याने दाखवून दिले आहे, की आमची आस्था शांततेवर आहे. पण, तरीही कुणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या आणि देशांतर्गत सुरक्षिततेसाठी अहोरात्र जागृत असणाऱ्या, आमच्या सैनिकांचा, पोलीस दलाचा आणि निमलष्करी दलाचा आम्हाला अभिमान आहे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

अयोध्येतील भूमिपूजनाचा सर्वांना अभिमान -
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात बोलताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, केवळ 10 दिवसांपूर्वीच अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीचा शुभारंभ झाला. याचा देशातील नागरिकांना अभिमान वाटतो. देशवासीयांनी दीर्घकाळ धैर्य आणि संयमाचा परिचय दिला आणि देशातील न्याय व्यवस्थेवर सदैव विश्वास ठेवला. श्रीराम जन्मभूमीशी संबंधित प्रकरणेही योग्य न्याय प्रक्रियेअंतर्गतच सोडविण्यात आले. सर्व पक्ष आणि नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मानाने स्वीकार करत शांतता, अहिंसा आणि प्रेमाचे उदाहरण संपूर्ण जगाला दाखवून दिले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.

जगासमोर उत्तम उदाहरण -
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, करोना महामारीवर नियंत्रण ठेवणे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यात  आपल्याला यश मिळाले आहे. हे संपूर्ण जगासमोर एक उदाहरण आहे. मोठी लोकसंख्या असेलेल्या देशात या आव्हानाचा आपण सामना करत आहोत. राज्य सरकारांनीही परिस्थितीनुसार यावर उपाययोजना केल्या. त्यांना जनतेनेही सहकार्य केलं.” 

कोरोना संकटामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना सरकारने केलेल्या मदतीवर बोलताना कोविंद म्हणाले, या महामारीचा सर्वाधिक फटका गरीब आणि दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांना बसला आहे. संकटाच्या या काळात त्यांना मदत करण्यासाठी,  तसेच व्हायरसला रोखण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: president ramnath kovind address to the nation befor independence day india china standoff corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.