“ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या, पण...”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:50 IST2026-03-07T17:49:14+5:302026-03-07T17:50:39+5:30
President Droupadi Murmu: पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

“ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या, पण...”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी
President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होत्या. सिलीगुडी येथील एका परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहभाग नोंदवला. परंतु, येथील व्यवस्थापनाबाबत राष्ट्रपती मुर्मू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आल्या. सिलिगुडी उपविभागातील फांसीदेवा परिसरात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर, राष्ट्रपतींनी या परिषदेसाठी निवडलेल्या ठिकाणाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि या मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
या परिषदेसाठी निवडलेले ठिकाण खूपच लहान होते
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, या परिषदेसाठी निवडलेले ठिकाण खूपच लहान होते, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहू शकले नाहीत. या ठिकाणी पाच हजार लोकांसाठी पुरेशी जागाही नव्हती. संथाल परिषदेनंतर, राष्ट्रपती दुसऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिधाननगर मैदानावर पोहोचल्या. त्या म्हणाल्या की, बिधाननगर मैदान मोठे आहे आणि लाखो लोकांना सामावून घेऊ शकते. जर या मोठ्या मैदानात आंतरराष्ट्रीय संथाल परिषद झाली असती तर सुमारे पाच लाख लोक उपस्थित राहू शकले असते. एवढे मोठे मैदान उपलब्ध असताना परिषदेसाठी एवढी लहान जागा का निवडली गेली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या आहेत
राष्ट्रपती मुर्मू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही उल्लेख केला. ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या आहेत, त्यांच्यावर बहिणीसारखे प्रेम करतात. ममता बॅनर्जी माझ्यावर नाराज आहेत, असे मला वाटत नाही. परंतु तरीही या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी इतके लहान ठिकाण का देण्यात आले हे समजत नाही. यातून असे दिसून येते की, कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि नंतर निघून जावे, असा त्यांचा हेतू होता.