उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:36 IST2025-07-24T06:36:46+5:302025-07-24T06:36:59+5:30
धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली.

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक घेण्याच्या पूर्वतयारीस सुरुवात केल्याची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी दिली. दोन दिवसांपूर्वी जगदीप धनखड यांनी अनपेक्षितपणे उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नव्या उपराष्ट्रपतींची निवड करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पूर्वतयारीशी निगडित सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल.
धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली.
धनखड यांनी केली सामानाची आवराआवर
उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांनी शासकीय निवासस्थानात आवराआवर सुरु केली आहे. ते लवकरच दुसरीकडे राहायला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनखड हे संसद भवन संकुलाजवळील चर्च रोडवर नव्याने उभारलेल्या उपराष्ट्रपती एन्क्लेव्हमध्ये एप्रिल २०२४ पासून राहण्यास गेले होते.
पंतप्रधान मोदी यांच्याशी अमित शाह यांची चर्चा
गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर तसेच लोकसभा, राज्यसभेतील कामकाज, विरोधकांनी सातत्याने येत असलेले अडथळे या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे कळते.