'दहा दिवसांत त्यांना नारळ! भाजप आणखी एका मुख्यमंत्र्याला हटवणार'; राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:08 IST2021-10-05T15:05:27+5:302021-10-05T15:08:20+5:30
तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले; आता पाचवा बदलण्याची तयारी सुरू असल्याचा दावा

'दहा दिवसांत त्यांना नारळ! भाजप आणखी एका मुख्यमंत्र्याला हटवणार'; राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे इशारे देत आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजप आमदार विरेंद्र गुज्जर सध्या उत्तर प्रदेशातल्या शामलीमध्ये आहेत. शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खट्टर यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. शेतकऱ्यांना जशासं तसं प्रत्युत्तर देण्याची भाषा केल्यानं खट्टर यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुज्जर यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. 'खट्टर यांना आठवडाभरात, दहा दिवसांत हटवलं जाईल. कोणी कोणावर उपचार करत नाही. देशात लोकशाही आहे. तिनंच सगळ्यांचे उपचार होतात,' असं गुज्जर म्हणाले. गुज्जर यांना भाजपनं काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं आमदार केलं आहे.
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन आणि करनालमध्ये शेतकऱ्यांवर झालेला लाठीमार यावरून खट्टर यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या हरयाणात धान्याच्या खरेदीतही उशीर होत आहे. त्यामुळेही खट्टर यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा आहे. भाजपनं गेल्या काही महिन्यांत उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री बदलले. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाची प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली.