प्रेमसिंग तमांग रविवारी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 09:22 IST2024-06-06T09:22:08+5:302024-06-06T09:22:52+5:30
तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राज्याची राजधानी गंगटोक येथील पालजोर स्टेडियमवर होणार आहे.

प्रेमसिंग तमांग रविवारी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
गंगटोक : सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रमुख प्रेमसिंग तमांग रविवार, दि. ९ जून रोजी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राज्याची राजधानी गंगटोक येथील पालजोर स्टेडियमवर होणार आहे.
पाच वर्षापूर्वीही नवीन मंत्रिपरिषदेचा शपथविधी समारंभ ९ जून रोजी पालजोर स्टेडियमवर झाला होता, अशी माहिती त्यांनी बुधवारी प्रसार माध्यमांना दिली.
विधानसभा निवडणुकीत आणि सिक्कीममधील एकमेव लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी एसकेच्या प्रचंड विजयाचे नेतृत्व करणारे तमांग यांनी पुन्हा एकदा पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार मानले.
सिक्कीमच्या विविध भागातून तसेच एसकेएमवश केडर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)