गर्भवती महिला प्रियकरासोबत पळाली; पतीने पकडले, विवस्त्र करून गावात धिंड काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 08:51 IST2023-09-02T08:51:05+5:302023-09-02T08:51:56+5:30
जेव्हा तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी महिलेचा पाठलाग केला आणि तिला पकडले.

गर्भवती महिला प्रियकरासोबत पळाली; पतीने पकडले, विवस्त्र करून गावात धिंड काढली
राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यात खळबळजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गर्भवती आदिवासी महिला प्रियकरासोबत पळून गेली म्हणून पतीने तिला पकडून विवस्त्र करत धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. यावरून भाजपाने गेहलोत सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी पती काना मीणा याला ताब्यात घेतले आहे.
प्रतापगढ़ जिल्ह्यातील धरियावद भागातील पहाडा गावातील ही घटना आहे. व्हिडीओ चार दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. पीडित महिलेचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तिचे जवळच्याच गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत, त्याच्यापासून ही महिला गर्भवती देखील आहे. यामुळे चार दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत पळून गेली.
जेव्हा तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी महिलेचा पाठलाग केला आणि तिला पकडले. या महिलेला गावात आणून निर्वस्त्र करून फिरविण्यात आले. व्हिडीओमध्ये महिला रडताना दिसत आहे. महिलेच्या पतीनेच तिला नग्न केले आणि मारहाण केली आहे. यानंतर महिलेला तिच्या गावी आणण्यात आले आहे. धिंड काढताना महिलेचे आई-वडील आणि कुटुंबातील अन्य लोकही उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.
गर्भवती महिलेला विवस्त्र करून, मारहाण करून गावात नेत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.