Prashant Kishor: “नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका, महाआघाडी टिकणार नाही”: प्रशांत किशोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 20:40 IST2023-02-21T20:38:38+5:302023-02-21T20:40:05+5:30
Prashant Kishor: पुढील विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सात पक्ष एकत्र राहून लढू शकत नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor: “नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका, महाआघाडी टिकणार नाही”: प्रशांत किशोर
Prashant Kishor: आताच्या घडीला बिहारमध्ये महाआघाडीमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राजकारणातील चाणक्य म्हणून ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांनी या सर्व प्रकरावर सडेतोड शब्दांत भाष्य केले आहे. महाआघाडी प्रयोग फार काळ टिकणारा नाही. मागील निवडणुका झाल्यावर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होऊ नये, असा सल्ला दिला होता, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, ही महाआघाडी किती काळ टिकेल हे मी सांगू शकत नाही, पण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ती टिकणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत हे ७ पक्ष एकत्र राहून निवडणूक लढवू शकत नाहीत. मी आघाडीचे राजकारण पाहिले आहे. सन २०१५ मध्ये मी महाआघाडी केली होती, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्ग निवडला आहे. जर कोणी चुकीचा मार्ग निवडला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, अशी टीका प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर केली.
नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका
सन २०२० मध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सांगितले होते की, तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. कारण बिहारच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे, मग तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची काय गरज आहे? आणि जर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर अन्य कुणी मोठा भाऊ होईल. ज्याचे नंबर जास्त असतील, त्यावेळी तुमचे काही चालणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, असे अनेकांना वाटते, याबाबत विचारले असता, मला सरकारमध्ये जावे असे वाटले असेल तर पदयात्रा केली नसती. एक फोन केल्यावर तसे घडू शकेल. नितीश कुमार मला दररोज फोन करतात आणि काहीही करून मदत करा, असे सांगतात. सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे वाटल्यास उद्याही होऊ शकेन, असे प्रशांत किशोर म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"