Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 10:07 IST2024-07-07T09:53:50+5:302024-07-07T10:07:30+5:30
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते बिहारच्या प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना भेटत आहेत.

Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते बिहारच्या प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना भेटत आहेत आणि आपल्या हेतूंची जाणीव करून देत आहे. याच दरम्यान, प्रशांत किशोर यांनी बिहारमधील तरुणांसाठी मोठी घोषणा केल्याने त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.
बेरोजगार असल्याने बिहारमधून नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांना येथे रोजगार देणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. त्यांनी अररियाला भेट दिली होती, जिथे त्यांनी बिहारमध्ये कशाप्रकारे रोजगार आणणार आहे हे सांगितलं. बिहारच्या विकासाच्या रोडमॅपवरही ते बोलले. अररियामधील लोकांसाठी तीन मोठ्या घोषणाही केल्या.
राज्यातच तरुणांना नोकऱ्या देण्याचा संकल्प
प्रशांत किशोर म्हणाले की, जन सुराजचा पहिला संकल्प २०२५ मध्ये वर्षभरात नाले, रस्ते, शाळा, रुग्णालये बांधली जातील किंवा नाही पण नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुणांना आणि बेरोजगारांना काम दिलं जाईल. बिहारमध्येच १०-१२ हजार रुपयांचा रोजगार दिला जाईल. मुलांसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान ५ जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दुसरा संकल्प आहे.
वृद्धांना २००० रुपये पेन्शन देण्याची घोषणा
प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, सध्या बिहार सरकार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा ४०० रुपये देतं. ज्या दिवशी ही व्यवस्था अस्तित्वात येईल, त्या दिवशी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्री-पुरुषांना दरमहा किमान २००० रुपये पेन्शन दिली जाईल.