शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:26 IST2025-07-30T11:26:13+5:302025-07-30T11:26:31+5:30
ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या.

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी
बालासोर / नवी दिल्ली : भारताने मंगळवारी आपल्या लष्करी क्षमतेत तांत्रिकदृष्ट्या नवा अध्याय जोडला. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची सलग दुसरी चाचणी यशस्वी ठरली. ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या.
या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५०० किमीपर्यंत असून, १ हजार किमी पेलोड ते वाहून नेऊ शकते. पहिली चाचणी सोमवारी यशस्वी ठरल्यानंतर मंगळवारी सलग दुसरी चाचणी घेण्यात आली. भारतीय बनावटीचे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) पारंपरिक युद्धक्षेत्रासाठी विकसित केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, लष्कर तसेच उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ची पेलोड अर्थात १ हजार किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मारक क्षमता १५० ते ५०० किमी असून, अचूक मारा हे त्याचे महत्त्व आहे.
नो फर्स्ट यूज न्युक्लियर धोरण
या धोरणाअंतर्गत पारंपरिक पद्धतीने शत्रूवर हल्ले करण्यासाठी ‘प्रलय’ची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजेच आण्विक अस्त्राशिवायही शत्रूला ताकदीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता यामुळे भारतीय हवाईदलास मिळेल.