pragya singh thakur calls mahatma gandhi as rashtra putra | महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र - प्रज्ञा सिंह ठाकूर 
महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र - प्रज्ञा सिंह ठाकूर 

ठळक मुद्देभोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात.प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता न म्हणता त्यांचा उल्लेख राष्ट्रपुत्र असा केला आहे.'महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत' असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता न म्हणता त्यांचा उल्लेख राष्ट्रपुत्र असा केला आहे.

'महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत' असे ठाकूर यांनी म्हटले आहे. भोपाळ रेल्वे स्थानकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतो. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात भाजपाने संकल्प यात्रा काढली आहे. मात्र यामध्ये ठाकूर यांनी भाग घेतला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नसल्याचे सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्याने ठाकूर अडचणीत आल्या होत्या. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना ठाकूर यांनी मोदींच्या 'स्वच्छ भारत' योजनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरुन पक्षाने ठाकूर यांना कठोर शब्दांमध्ये समज दिली. पक्षाच्या योजना आणि विचारधारा यांच्याविरोधात जाणारी विधाने करू नका, अशी सूचना नेतृत्त्वाकडून त्यांना करण्यात आली. ठाकूर 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

गटार आणि शौचालय साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचे विधान ठाकूर यांनी केले होते. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली. ठाकूर यांनी त्यांच्या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगली. 'आम्ही गटार आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू', असे ठाकूर म्हणाल्या होत्या. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकूर यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. 


 


Web Title: pragya singh thakur calls mahatma gandhi as rashtra putra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.