ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 05:56 IST2026-04-12T05:55:21+5:302026-04-12T05:56:54+5:30
India-US Partnership News:

ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री व अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्यात ऊर्जा सहकार्याला बळ देण्याच्या उद्देशाने येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत, अणुऊर्जा क्षेत्रासोबतच कोळसा वायूकरण व एलपीजी निर्यात यांसारख्या नवीन क्षेत्रांमधील ऊर्जा सहकार्य अधिक पुढे नेण्याबाबत चर्चा झाली. मिस्री व राईट यांच्यातील चर्चेचा मुख्य भर ऊर्जा सुरक्षा वाढवणे, द्विपक्षीय ऊर्जा व्यापार अधिक दृढ करणे व भारत-अमेरिका ऊर्जा भागीदारी बळकट करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे यावर होता, अशी माहिती भारतीय दूतावासाने शनिवारी दिली.
कोळसा वायूकरण व अमेरिकेकडून एलपीजी निर्यात यांसारख्या क्षेत्रांसोबत नागरी अणुऊर्जा सहकार्याच्या बाबतीतही भारताला सहकार्य करण्यास अमेरिका सज्ज असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेले अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गेई गोर यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र सचिव मिस्री आजपासून युरोप दौऱ्यावर
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री रविवारपासून पॅरिस व बर्लिनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. ऊर्जा सुरक्षितता, संरक्षण सहकार्य आणि व्यापार वाढवणे हे या दौऱ्याचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. सध्याच्या विस्कळीत जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे ही तिन्ही क्षेत्र अधिकाधिक महत्त्वपूर्ण बनली आहेत. अमेरिकन दौऱ्यानंतर लगेच मिस्री फ्रान्स व जर्ममीच्या दौऱ्यावर जात आहेत, हे विशेष.
मार्को रुबियो यांचीही भेट
- अमेरिका-भारत ऊर्जा सहकार्याच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी ख्रिस राईट व भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत शुक्रवारची सकाळ घालवणे अत्यंत आनंददायी होते.
- भारताने ऐतिहासिक ‘शांती विधेयक’ मंजूर केल्याने, कोळसा वायूकरण व अमेरिकेकडून एलपीजी निर्यात यांसारख्या इतर क्षेत्रांव्यतिरिक्त, नागरी अणुऊर्जा क्षेत्रातही सहकार्य करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे गोर यांनी नमूद केले.
- परराष्ट्र सचिव मिस्री मंगळवारी रात्री उशिरा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संरक्षण, वाणिज्य व परराष्ट्र विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली.