पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:21 IST2025-05-12T19:19:13+5:302025-05-12T19:21:03+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

फोटो - आजतक
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या हल्ल्यात १२ वर्षांची जुळी भावंडं झोया आणि अयान यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील मामा आणि मामींचा देखील जागीच मृत्यू झाला.
मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून हे कुटुंब फक्त दोन महिन्यांपूर्वीच पूंछला आलं होतं. ते भाड्याच्या घरात राहत होते. पण ५ मे च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात हे कुटुंब उद्ध्वस्त झालं. मुलांचे वडील ४८ वर्षीय रमीज खान हे सध्या जम्मू रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना अद्याप मुलांच्या मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही.
रमीज खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. आई उर्शा खान मानसिकदृष्ट्या खचली आहे. एकीकडे दोन्ही मुलं गेल्याचं दुःख आणि दुसरीकडे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या पतीची त्यांना काळजी वाटत आहे. कुटुंबाचे जवळचे नातेवाईक मारिया आणि सोहेल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोया आणि अयान खूप हुशार आणि प्रेमळ मुलं होती.
अयानला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याची प्रकृती गंभीर होती. झोया देखील गंभीर जखमी झाली होती. दोघांचाही काही मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. कुटुंबाने सरकारला रमीझला दिल्लीला घेऊन जाण्याची आणि त्याला सर्वोत्तम उपचार देण्याची विनंती केली आहे. तसेच सीमावर्ती भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत असं म्हटलं आहे.