Politics: राज्यांतील सुभेदारांचे भाजप श्रेष्ठी घेणार सहकार्य, लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 06:44 IST2022-04-05T06:44:37+5:302022-04-05T06:44:56+5:30
BJP Politics: लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राजस्थान आणि छत्तीसगढमधील पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे तसेच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकविण्यासाठी तयारी केली आहे.

Politics: राज्यांतील सुभेदारांचे भाजप श्रेष्ठी घेणार सहकार्य, लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राजस्थान आणि छत्तीसगढमधील पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे तसेच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकविण्यासाठी तयारी केली आहे.
२०१८ पासून राजकीयदृष्ट्या सक्रिय नसलेल्या नेत्या वसुंधराराजे शिंदे यांचे सहकार्य घेण्याचेही भाजपश्रेष्ठींनी ठरविले आहे. भाजपने काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचाही प्रयत्न केला होता; परंतु, यश आले नव्हते. आता वसुंधराराजे यांनीही तयारी दाखविली असून योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना लखनौला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राजस्थान भाजपच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावले होते. एवढेच नव्हेतर त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.
२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ध्यानात घेता या सर्व राज्यांत विजय मिळविण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यासाठी नेत्यांनी आपसांतील मतभेद मिटवावेत, असेही भाजपला वाटते.
माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना पर्याय न मिळणे, ही भाजपसाठी छत्तीसगढमध्ये चिंतेची बाब आहे. भाजपने छत्तीसगढमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी करण्याचे प्रयत्न केले; परंतु, ते यशस्वी ठरले नाहीत. याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
येडियुरप्पा का आहेत नाराज?
कर्नाटकात सत्ता असली तरी भाजपसमक्ष मोठी समस्या आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेच भाजपसाठी मुख्य चितेंची बाब आहे. विद्यमान मुख्यमंत्री त्याच्या मर्जीतील असतानाही श्रेष्ठींनी पदावरून हटविल्याप्रकरणी येडियुरप्पा यांनी समेट केलेला नाही तसेच जातीच्या आधारे ज्या प्रकारे समाजात फूट पाडली जात आहे, त्यावरुनही येडियुरप्पा नाराज आहेत.