राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:38 AM2022-09-26T05:38:48+5:302022-09-26T05:39:20+5:30

अशोक गेहलोत समर्थक आक्रमक, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध

Political earthquake in Rajasthan as many as 82 Congress MLAs resign ashok gehlot sachin pilot | राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

Next

जयपूर : राजस्थानातील राजकारणाने आणखी एक अनपेक्षित वळण घेतले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांपैकी ८२ जणांनी  आपल्या पदाचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे सुपुर्द केले. 

यामुळे राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन तसेच माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे देखील उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे अवघे २५ आमदार हजर होते. त्याचवेळी पायलट यांच्या विरोधात वातावरण किती तापलेले आहे याची झलक सर्वांना पाहायला मिळाली.

‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वाचा आग्रह
एक व्यक्ती, एक पद या तत्त्वासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र ते अशोक गेहलोत व त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नाही.

आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता 
राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०८ आमदार असून त्यातील बहुतांश आमदारांचे अशोक गेहलोत यांना समर्थन असल्याचे रविवारच्या घडामोडींतून दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांपैकी काही जण विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी गेले व त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर ८२ आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

चर्चेसाठी दिल्लीत या
पक्षातील वाढता संघर्ष लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांना चर्चेसाठी दिल्ली येथे बोलाविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदासाठी सी. पी. जोशींचे नाव 
गेहलोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यास त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते सचिन पायलट किंवा विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांची  नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यातील पायलट यांच्या नावाला राजस्थान काँग्रेसमध्येच मोठा विरोध आहे. तर सी. पी. जोशी यांच्याबद्दल अद्याप कोणत्याही आमदाराने जाहीर विरोध केलेला नाही. 

सचिन पायलट हे चाळिशीच्या मध्यात असून, जोशी (७०) ज्येष्ठ नेते आहेत. जोशी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि २००८ मध्ये ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते; पण, त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.

Web Title: Political earthquake in Rajasthan as many as 82 Congress MLAs resign ashok gehlot sachin pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.