शिक्षक दिनाच्या दिवशीच वेतनासाठी आंदोलन करणा-या शिक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:07 IST2017-09-05T16:02:03+5:302017-09-05T16:07:21+5:30
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिक्षक दिनाच्या दिवशीच वेतनासाठी आंदोलन करणा-या शिक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
लखनऊ, दि. 5 - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक शिक्षक 3 वर्षांचं थकीत वेतन मिळावं, यासाठी आंदोलन करत होते. सर्व शिक्षकांनी मिळून उत्तर प्रदेश विधानसभेला घेराव घालण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
लाठीचार्जमुळे विरोध प्रदर्शन करणारे अनेक शिक्षक जखमी झाले. तसेच एक महिलाही बेशुद्ध झाली. लखनऊमध्ये पोलिसांनी शिक्षकांवर जोरदार लाठीचार्ज केला. शिक्षक गेल्या 40 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे नाराज होते. वेतन मिळण्याच्या मागणीसाठी लखनऊमधल्या चारबागमध्ये अनेक शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी उत्तर प्रदेश विधानभवनाच्या दिशेनं कूच केलं.
पोलिसांनी त्यांना बर्लिंग्टन चौकात रोखलं. मात्र तरीही शिक्षक ऐकत नसल्याचं पाहून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आदर्श प्रेरक शिक्षकांना 2 हजारांचं मानधन दिलं जातं. परंतु गेल्या 40 महिन्यांपासून त्यांना हे मानधन मिळालं नाहीये. आदर्श प्रेरक शिक्षक हे सरकारची योजना गावागावात पोहोचवण्याचं काम करतात.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी 6 सप्टेंबर रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनवाणी अध्यापनाद्वारे निषेध आंदोलन करणार आहेत. तसेच 5 सप्टेंबरला दिल्लीत ऑल इंडिया फेडरेनशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एआयफुक्टो) ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने फक्त 1 हजार 628 शाळांना 20 टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक ‘आत्मक्लेष दिन’ म्हणून पाळणार आहेत. तसेच ते 6 सप्टेंबरला अनवाणी अध्यापन करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. एआयफुक्टोनेही 5 सप्टेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील, इतर विद्यापीठांतील प्राध्यापक त्यांच्या विविध मागण्यांसाठी यात सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली.