ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २०- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा देत असले तरी बुधवारी दिल्लीतील एका पोलिस अधिका-यानेच मोदींचे सुरक्षा कवच तोडून पंतप्रधानांच्या गाड्यांच्या ताफ्यात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी संबंधित अधिका-याला निलंबित करत त्याच्याविरोधात चौकशी समितीही नेमली आहे.
बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या रेसकोर्स रोडवरील सरकारी निवासस्थानी परतत होते. सफदरगंज रोड येथील इंदिरा गांधी मेमोरियलजवळ पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा रवाना होत असल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. या दरम्यान हौजखास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज कुमार खासगी वाहनाने इंद्रपुरीतील घरी परतत होते. मोदींच्या गाडीचा ताफा तिथून जात असताना नीरज कुमारांनी स्वतःची गाडी मोदींच्या ताफ्यात घुसवली. अज्ञात वाहन मोदींच्या ताफ्यात आल्याने मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा अधिका-यांचे अवसानच गळाले होते. पंतप्रधानाच्या ताफ्यातील दिल्ली पोलिस दलाचे सहाय्यक पोलिस आयुक्तांनी कसेबसे ते अज्ञात वाहन थांबवले व वाहनचालकाची चौकशी सुरु केली. नीरज कुमार यांनी स्वतःची ओळख सांगून सहाय्यक पोलिस आयुक्तांशीच हुज्जत घालायला सुरुवात केली. अखेरीस एसीपींनी वायरलेसवर 'अज्ञात वाहन पंतप्रधानांच्या ताफ्यात शिरले आहे. वाहनचालक स्वतःला दिल्ली पोलिस दलातील अधिकारी असल्याचे सांगत असून तो आमच्याशी वाद घालत आहे' असा संदेश पाठवला. हा संदेश पोहोचताच दिल्ली पोलिस अधिका-यांची तारांबळ उडाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिका-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सध्या नीरज कुमार यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. मात्र पोलिस अधिका-याच्या या बेजबाबदारपणामुळे दिल्ली पोलिसपासून ते गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी सर्वच कामाला लागले.