हत्येची कबूली देण्यासाठी पोलिसांनी नोकरावर दबाव टाकला - थरुर
By Admin | Updated: January 7, 2015 15:49 IST2015-01-07T15:49:56+5:302015-01-07T15:49:56+5:30
दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी घरातील नोकरावर दबाव टाकला होता असा आरोप शशी थरुर यांनी केल्याने दिल्ली पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हत्येची कबूली देण्यासाठी पोलिसांनी नोकरावर दबाव टाकला - थरुर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असतानाच याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी घरातील नोकरावर दबाव टाकला होता असा आरोप शशी थरुर यांनी केल्याचे समोर आले आहे.
सुनंदा पुष्कर यांचा गेल्या वर्षी १७ जानेवारी रोजी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्याची घोषणाही दिल्ली पोलिस आयुक्तांनी केली असून ज्यांच्या चौकशींची गरज वाटेल त्यांची चौकशी केली जाईल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. मात्र आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शशी थरुर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांना पत्र पाठवले होते. दिल्ली पोलिस सुनंदा पुष्कर यांच्या हत्येची कबुली द्यावी यासाठी आमच्या घरातील नोकरावर दबाव टाकत असल्याचे थरुर यांनी पत्रात म्हटले होते. मी आणि नोकराने मिळून सुनंदा पुष्करची हत्या केली होती अशी कबुली द्यावी यासाठी दिल्ली पोलिसांनी नोकराला मारहाणही केली होती असा गंभीर आरोप थरुर यांनी केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या तपासाविषयी संशय व्यक्त होत आहे.