काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नवीन अरोडा यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता पंजाब पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बादल उर्फ बंदी याला जलालाबादमधील एका स्मशानभूमीजवळ झालेल्या चकमकीत ठार केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर या ठिकाणी पोहोचलेल्या स्पेशल टास्क फोर्स आणि फिरोजपूर पोलिसांच्या पथकावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात बादल याला गोळी लागली. तर एक पोलीस हेड कॉन्स्टेबलही गोळीबारात जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या बादल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिथे त्याचा मृत्यू झाला. तर घटनास्थळावरून पोलिसांनी बादल याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी पत्रकामधून अधिक माहिती दिली आहे. नवीन अरोडा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओखळ बटिया वाली येखील रहिवासी असलेल्या बादल याच्या रूपात झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिस फजिल्का जिल्ह्यातील अमीर खास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुगिया गावातील स्मशानभूमीजवळ पोहोचले. तिथे बादल याच्या दोन सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यातील एक गोळी एका पोलीस अधिकाऱ्याला लागली. तर दुसरी गोळी अन्य एका पोलीस अधिकाऱ्याच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये अडकली. आरोपी बादल याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासानुसार ही हत्या एका नियोजनबद्ध कटाचा भाग होती. त्यामध्ये एकूण ५ आरोपी सहभागी होते. १३ नोव्हेंबर रोजी एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणण्यात आले.